⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

‘हिंदुस्थानी भाऊ’ची माणुसकी, जळगावात केले असे काही…

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । प्रसिद्ध सोशल मिडिया स्टार आणि अभिनेता विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ नुकतेच जळगावात येऊन गेला. एल.के.फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमातून निघताना त्याने अशी काही कृती केली की सर्वच अवाक झाले. इतकंच नव्हे तर सर्वांनी हिंदुस्तानी भाऊच्या कृतीचे कौतूक देखील केले.

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता विकास पाठक गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रचंड प्रकाशझोतात आला होता. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर अचानक जमलेले विद्यार्थी आणि झालेला गोंधळ यामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी चिथावणी दिल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक देखील केली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या किनारी एल.के. फाऊंडेशनतर्फे भव्य ५१ फुटी रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री ना.गिरीश महाजन व हिंदुस्तानी भाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मनपा सभागृह नेते ललित कोल्हे व पियुष कोल्हे यांनी सर्व नियोजन केले होते. रावण दहन कार्यक्रम आटोपल्यावर वाहनांचा ताफा शहराच्या दिशेने निघाला असता एक चिमुकली रडताना दिसली.

हिंदुस्तानी भाऊने चारचाकीतून ते पाहिले असता त्याने गाडी थांबवून चिमुकलीची विचारणा केली. एका वाहनाच्या चाकाखाली आलेला दगड उडून डोक्याला लागल्याने ती जखमी झाली होती. चिमुकलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने हिंदुस्तानी भाऊने क्षणाचा देखील विलंब न करता तिला आपल्या वाहनात बसविले. तेव्हा सरिता माळी यांनी चिमुकलीला धीर देत तिचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्तानी भाऊने चिमुकलीला स्वतः रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार करूवून घेतले. तसेच तिच्या पालकांशी देखील चर्चा केली.

हिंदुस्तानी भाऊच्या माणुसकीचा प्रत्यय आल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक केले. जळगावात अनेकांनी हिंदुस्तानी भाऊसोबत सेल्फी क्लीक केले.