अमळनेर बसस्थानकात वृद्धेची सोन्याची पोत चोरणाऱ्या धुळ्याच्या दोन महिला जाळ्यात

जून 13, 2026 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर बस स्थानकात एसटी बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करणाऱ्या धुळ्यातील दोन संशयित महिलांना पोलिसांनी अत्यंत चातुर्याने मालेगाव येथून अटक केली आहे. चोरीची घटना घडल्यानंतर अमळनेर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या दोन तासांत या महिला चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

crime 2 jpg webp

शारदा सुनील कसबे (वय ३५) आणि माया श्रावण कांबळे (वय ५५, दोन्ही रा. एकवीरा माता मंदिराजवळ, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित महिला आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कल्पनाबाई अशोक शिंपी (वय ६५, रा. शिरूड, ता. अमळनेर) या वृद्ध महिला मंगळवारी (दि. ९) सकाळी अमळनेर बसस्थानकात आल्या होत्या. येथून शिरूडला जाण्यासाठी त्या ‘मुकटी’ बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिलांनी त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अत्यंत शिताफीने चोरून नेली. बसमध्ये चढल्यानंतर गळ्यातील पोत गायब झाल्याचे कल्पनाबाई यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र पोत मिळून आली नाही. अखेर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच अमळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. पोलिसांनी तात्काळ बसस्थानक परिसर आणि बाहेरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. यावेळी पोलिसांना दोन संशयित महिला बसजवळ घुटमळताना आणि चोरीनंतर घाईघाईने बाहेर येऊन एका रिक्षात बसून पळून जाताना स्पष्ट दिसल्या. यावरून पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या महिला मालेगावच्या दिशेने गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. अमळनेर पोलिसांनी तात्काळ मालेगाव पोलिसांशी संपर्क साधून नाकाबंदी केली आणि मालेगावजवळ रिक्षेसह दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेतले.चोरीची घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत अमळनेर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून दोन्ही महिला आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणी पुढील तपास अमळनेर पोलीस करीत असून, या महिलांनी अशा प्रकारे इतरही काही गुन्हे केले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now