नाशिकमध्ये माघार, पण जळगावात रेश्मा काळे ठाम; महायुतीचं टेन्शन वाढलं

जून 11, 2026 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी आणखी तीव्र होताना दिसत असून शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट करत अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या सरिता माळी यांनी केला असून यामुळे भाजप आणि महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

reshma kale 1

एकीकडे नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर जळगावातही रेश्मा काळे माघार घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत रेश्मा काळे यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “पाठिंबा आणि माघारीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, मी थेट शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेईन. तोपर्यंत माझी उमेदवारी कायम राहणार आहे.”

दरम्यान, वरिष्ठ स्तरावर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रेश्मा काळे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख सरिता माळी आणि शेकडो महिला कार्यकर्त्या त्यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

याच प्रचारादरम्यान सरिता माळी यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है,” असा दावा करत भाजपचे अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे.

महिलांना उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याच्या नाराजीतून आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे रेश्मा काळे यांनी सांगितले. मतदारसंघात आपल्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रेश्मा काळे यांच्या ठाम भूमिकेमुळे महायुतीसमोरील अंतर्गत बंडखोरीचा पेच अधिकच वाढला असून अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक बनली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर हा तिढा सुटणार की महायुतीला जळगावात राजकीय फटका बसणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now