जळगावात रणरणत्या उन्हात एकाचे आमरण उपोषण! भ्रष्टाचाराबाबत केले गंभीर आरोप

जून 9, 2026 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कैलास नरसिंग पारधी यांनी जळगावातील जी.एस. मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानात कोणत्याही मंडपाशिवाय उघड्यावर सुरू असलेल्या या उपोषणामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. या कडक उन्हात उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे.

kailas pardhi

​उपोषणकर्ते यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकूण १६ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील बंगाली वैद्यांची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करणे, भुसावळ, यावल, अमळनेर आणि बोदवड येथील आरोग्य विभागातील दोषींवर निलंबनाची कारवाई करणे, आणि संजय गांधी निराधार योजना व इतर पेन्शन योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणे या मागण्यांचा समावेश आहे.

​याशिवाय वराडसिम आणि मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील घरकुल मंजुरीतील गैरव्यवहार, ५० टक्के सूट भरणा जी.आर. चे उल्लंघन, विकास निधीचा अपहार आणि सुळे (ता. मुक्ताईनगर) येथील पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आणि मद्यधुंद अवस्थेत चार्ज घेतल्याचे गंभीर आरोपही यात आहेत.

​प्रशासनाकडून अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरूच असून, भर उन्हात जिवाची पर्वा न करता बसलेल्या या उपोषणकर्त्यांमुळे प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now