जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२६ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर आज मंगळवारी सकाळी कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हा थरारक अपघात आज मंगळवार, दिनांक ९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ, हॉटेल वृंदावननजीक घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याच्या दिशेने एक दुचाकी आणि एसटी बस जात होती. याच वेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच धुळ्याकडून अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने या दुचाकी आणि एसटी बसला समोरून जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये वाहनांचा पार चक्काचूर झाला. कारची धडक बसताच दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि धरणगाव येथील रहिवासी असलेले दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तसेच कारमधील महिला आणि पुरुष मिळून एकूण ५ जणांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत
साखरपुड्यासाठी गुजरातवरून येत होते कुटुंब
विशेष अपघातग्रस्त कारमधील सर्व प्रवासी हे मूळचे गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी होते. हे सर्व कुटुंब अमळनेर येथे आयोजित एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आनंदाने येत होते. मात्र, अमळनेरमध्ये पोहोचण्यापूर्वी अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्यांच्या कारला अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला आणि इतर जखमींना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी गुजरात येथील व्यारा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.











