जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिका धिवरे आणि मातोश्री उषा धिवरे यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना (पोलीस लाईन) सदिच्छा भेट दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि गरजा जाणून घेणे तसेच त्यांचे मनोबल वाढविणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

अडचणींची घेतली दखल, दिले आश्वासने
या भेटीदरम्यान त्यांनी विविध निवासस्थानांना भेट देऊन पोलीस शिपाई व त्यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. पोलीस कर्मचारी चोवीस तास कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, मुलांच्या शिक्षणासंदर्भातील प्रश्न, आरोग्यविषयक बाबी, निवासस्थानांमधील सोयी-सुविधा तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी त्यांनी माहिती घेतली. कुटुंबीयांनी मांडलेल्या विविध सूचनांची व समस्यांची दखल घेत, या बाबी तत्काळ संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

“पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन हे अत्यंत जबाबदारीचे आणि आव्हानात्मक आहे. ते दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत असताना, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कुटुंबीयांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा हाच पाठिंबा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असतो,” असे प्रतिपादन यावेळी श्रीमती सानिका धिवरे यांनी केले.
हेल्मेट वापरण्याचे आवाहन आणि व्यसनमुक्तीवर चर्चा
भेटीदरम्यान त्यांनी पोलीस दलातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे आवाहन केले. अपघातांचे प्रमाण पाहता सर्व पोलीस अंमलदारांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर सक्तीने करावा, असे त्यांनी सांगितले. यासोबतच पोलीस वसाहतीमध्ये व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि आरोग्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व यावरही त्यांनी कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली.
श्रीमती धिवरे यांनी निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष भेट घेतली. विद्यार्थ्यांशी त्यांची शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी आणि अभ्यासातील आव्हाने यावर संवाद साधला. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. या प्रसंगी उपस्थित लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मिठाई व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मुलांनी व कुटुंबीयांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. या अनौपचारिक संवादामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.










