ॲड. पियुष पाटलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मनपाचा कोट्यवधींचा भूखंड वाचला

मे 7, 2026 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीने महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील भिंत पाडल्यानंतर सुरू झालेला वाद आता निकालात निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड.पीयूष पाटील यांच्या तक्रारीनंतर जळगाव महानगरपालिकेने संबंधित जागेवर जेसीबी चालवून ती अधिकृतपणे आपल्या ताब्यात घेतली असून, तिथे मालकी हक्काचा फलकही लावला आहे.यामुळे मनपाचा कोट्यवधींचा भूखंड वाचला आहे.

piyush patil

काय आहे नेमकं प्रकरण?

शहरात सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी महापालिकेचा मोठा भूखंड असून अनेक वर्षांपूर्वी हा भूखंड नर्सिंग होम कॉलेजसाठी देण्यात आला होता. मात्र, तिथे कोणतेही बांधकाम न झाल्याने मनपाने तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. या ठिकाणी स्थानिक तरुण मैदानी खेळ खेळण्यासाठी वापर करत असत. मात्र,
काही दिवसांपूर्वी या भूखंडाच्या संरक्षणासाठी उभारलेली भिंत रात्रीतून तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. यामागे इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी ॲड. पियुष नरेंद्र (अण्णा) पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. तसेच, या ठिकाणी लँडमाफियाचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली.

१० वर्षांपूर्वी देखील रेड क्रॉस सोसायटीने या जागेवर आपला लोगो असलेला गेट लावून कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांनी आवाज उठवल्याने तो डाव फसला होता. आता पुन्हा त्याच पद्धतीने जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप ॲड. पाटील यांनी केला आहे. ॲड. पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मनपाने संबंधित जागेवर आपला हक्क सिद्ध करत ताब्याचा फलक लावण्यात आला. यावेळी ॲड. पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आता या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड. पाटील यांनी महापौरांकडे केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now