अखेर ‘ॲटलांटा’ कायद्याच्या कचाट्यात; जळगाव मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

मे 2, 2026 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘ॲटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया)’ विरोधात अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

atlanta

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ॲटलांटा कंपनीला १९९६ ते २००२ या काळात शहरातील डांबरीकरणासह इतर कामांचे एकूण २५६ कार्यादेश देण्यात आले होते. यासाठी कंपनीला २४ कोटींहून अधिक रक्कम ॲडव्हान्स म्हणून देण्यात आली होती. यापैकी कंपनीने केवळ १९ कोटी ५५ लाख रुपयांची कामे पूर्ण केली. उर्वरित ४ कोटी ७९ लाख रुपये कंपनीकडे २००१-०२ पासून थकीत होते. यावर महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली असता सदर कंपनीने स्वतःकडे थकबाकी असल्याचे २००५ मध्ये एका पत्राद्वारे मान्यही केले होते.

या थकीत रकमेवर महापालिका नियमांनुसार दरमहा ९ टक्के चक्रवाढ व्याज आणि दररोज ५०० रुपये दंड आकारण्यात आला. आज ही एकूण थकबाकी ४२ कोटी ६० लाखांवर गेली आहे. यामुळे कंपनीने जळगाव शहर महापालिकेची वर नमूद केलेल्या रकमेची फसवणूक केली आहे. यामुळे ॲटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि संचालकांच्या विरूध्द फसवणूक केल्याबद्दल शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा हा भादंवि कलम ४०६, ४०९ आणि ४२० अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक सागर शिंपी हे करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात ॲटलांटा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले. या अनुषंगाने काल रात्री महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now