जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासोबतच रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कंबर कसली आहे. गुरुवारी, ३० एप्रिल रोजी प्रशासनाने धडाकेबाज मोहीम राबवत सुप्रीम कॉलनी ते जळगाव टोल नाका या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे आणि व्यवसाय भुईसपाट केले.

बुलडोझरचा दणका; अवैध ढाबे भुईसपाट
गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसी पोलीस स्टेशन ते सुप्रीम कॉलनी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली होती. याचा फटका वाहतुकीला बसत होता. महापालिकेच्या पथकाने आज जेसीबीच्या साहाय्याने या मार्गावरील सर्व विनापरवाना चालवले जाणारे लहान-मोठे ढाबे जमीनदोस्त केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे ढाबा चालकांची मोठी पळापळ झाली.

उघड्यावरील मांस विक्रीला चाप
या मोहिमेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उघड्यावर चालणारी मांस विक्री. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने या मार्गावरील १७ ते १८ अवैध मांस विक्रीची दुकाने तातडीने बंद पाडली.











