जळगाव मनपाच्या भूखंडावर ‘रेडक्रॉस’चा डल्ला? भिंत तोडून अतिक्रमण केल्याचा ॲड. पियुष पाटलांचा आरोप

एप्रिल 24, 2026 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर ‘इंडियन रेडक्रॉस सोसायटी’ने अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या अंधारात तब्बल १५ ते २० फूट कंपाउंड भिंत तोडून जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण करून या ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महापौरांसह मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे

redcross
rc

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (GMC) बांधकाम सुरू असताना वेस्ट मटेरियल टाकण्यासाठी ५ फूट भिंत तोडण्यात आली होती. बांधकाम पूर्ण होत आले तरी महाविद्यालयाने ही भिंत बांधली नाही. याच संधीचा फायदा घेत शेजारील रेडक्रॉस सोसायटीने रात्रीतून अधिकची १५-२० फूट भिंत तोडून तिथे जागा सपाट केली. सद्यस्थितीत या ठिकाणी रेडक्रॉसची वाहने उभी केली जात असून, महापालिकेच्या मालकीच्या जागेचा अनधिकृत वापर सुरू करण्यात आला आहे.

ॲड. पियुष पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही एक मोठी संस्था असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी (FD) आहेत. या ठेवींवर संस्थेला मोठ्या प्रमाणावर व्याज मिळते. “ज्या संस्थेकडे स्वतःची जागा खरेदी करण्याची आणि भव्य इमारत बांधण्याची आर्थिक क्षमता आहे, त्यांना मनपाच्या मोफत जागेचा मोह का सुटत आहे?” असा सवाल ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

काही वर्षांपूर्वीदेखील रेडक्रॉसने या जागेवर आपल्या संस्थेचा ‘लोगो’ असलेले गेट बसवून जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे हा प्रयत्न फसला होता. आता पुन्हा एकदा भिंत तोडून मागील दाराने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. तसेच, रेडक्रॉसची रक्तपेढी असलेली इमारतही म.न.पा.च्या मालकीच्या भूखंडावर उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, त्या बदल्यात महानगरपालिकेला कोणताही मोबदला दिला जात नसल्याचे म्हणणे आहे.

“रेडक्रॉससारखी संस्था, ज्यात अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे, ती संस्था अशा प्रकारे रात्रीतून भिंती तोडून अतिक्रमण करत असेल तर हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे प्रशासनाचे काम आहे. ही भिंत तात्काळ बांधण्यात येवून सदर जागा ही सुरक्षित व बंदिस्त करावी तसेच सदर संरक्षण भिंत बांधण्याचा संपूर्ण खर्च हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचेकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान येत्या काळात रेडक्रॉस सोसायटीच्या अशा अनेक ‘काळ्या धंद्यांचा’ पर्दाफाश जनतेसमोर करणार असल्याचे ॲड. पियुष पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now