जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२६ । ममुराबाद रोडवरील बोगस कॉल सेंटर प्रकरणी अनेक महिन्यापासून कारागृहात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे दीर्घकाळ कारागृहात राहिल्यानंतर त्यांची मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला होता. या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांशी संपर्क साधून त्यांची ऑनलाइन फसवणूक आणि लूट केली जात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता.

या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार मुख्य संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. तपास अधिकारी तथा उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी न्यायालयात हा केवळ फसवणुकीचा गुन्हा नसून तो ‘संघटित गुन्हेगारी’ चा प्रकार असल्याचे पुराव्यानिशी मांडले होते. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले होते.
या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केल्याने त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












