जळगाव मनपाचा ‘बुलडोझर’ सुसाट ! आकाशवाणी आणि प्रभात चौकातील अतिक्रमणावर कारवाई

एप्रिल 21, 2026 2:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२६ । जळगाव शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून आज मंगळवारी (२१ एप्रिल) अतिक्रमण विरोधी मोहिमेचा दुसरा टप्पा अत्यंत आक्रमकपणे राबवण्यात आला. महापालिकेचे पथक शहराच्या वर्दळीच्या आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात धडकले, ज्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

atikraman

गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी ते प्रभात चौक दरम्यानच्या समांतर रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्स आणि टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. आजच्या मोहिमेत मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे रस्त्यावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले असून, यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील समांतर रस्ते हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, मात्र हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे येथे नेहमीच कोंडी होत असे. आजच्या या धडक कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांनी मनपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्ते जोपर्यंत पूर्णपणे मोकळे होत नाहीत आणि वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही ‘धडक मोहीम’ थांबणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now