जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या म्हणजेच १४ एप्रिल रोजी जळगाव शहरात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने काही भागांतील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या आदेशानुसार, उद्या शहरातील प्रमुख मार्गांवरील दैनंदिन बाजारपेठा तसेच हरी विठ्ठल नगर व खंडेराव नगर परिसरातील साप्ताहिक (आठवडी) बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉकर्स, विक्रेते व व्यावसायिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणुकीदरम्यान सर्व रस्ते मोकळे ठेवून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या बॅनर्स व झेंड्यांसाठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रिक पोल किंवा फोन लाईनवर बॅनर्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.










