पिंप्राळा उड्डाणपुलाजवळ सर्कल उभारण्याची मागणी; नगरसेविका भारती सोनवणे यांचे उपमहापौरांना निवेदन

एप्रिल 7, 2026 9:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या उताराजवळील सुरेश कलेक्शन परिसरातील चौकात वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून, येथे तात्काळ ‘सर्कल’ विकसित करण्याचा ठराव आगामी महासभेत मंजूर करावा, अशी मागणी नगरसेविका भारती सागर सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमहापौर मनोज चौधरी यांना निवेदन दिले आहे.

New Project 2

निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंप्राळा उड्डाणपुलाचा उतार थेट या चौकात येत असल्याने आणि याच ठिकाणी नागरिकांची वर्दळ, वाहनांचे पार्किंग व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने हा परिसर अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते.

या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात होत असून, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारती सोनवणे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, विकास आराखडा (DP Plan) आणि ले-आउटमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे सर्कल दर्शविलेले आहे. असे असतानाही, संबंधित प्लॉट मालकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्या जागेवर कंपाउंड वॉलचे पक्के बांधकाम केले असल्याचे दिसून येते.

हे अनधिकृत बांधकाम तातडीने जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नियोजित सर्कलचे काम पूर्ण करावे. शहराच्या विकासाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सर्कल अत्यंत महत्त्वाचे असून, महासभेने या विषयाला प्राधान्य देऊन ठराव मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now