भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ४० लाखांचे सोने, १६ मोटारसायकली जप्त

जानेवारी 20, 2026 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे २८७.७ ग्रॅम वजनाचे वितळविलेले सोन्याचे लगड, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच १६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

combinOP

मध्य प्रदेशातील बडोद पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी करारअली हुजुर अली हा भुसावळ येथील मुस्लीम कॉलनी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार १५ जानेवारी रोजी रात्री पोलिस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करुन लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली होती.

यानंतर रविवारी रात्री या भागात कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. एका घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे लगड आढळून आले. चौकशीत मरीयम बी. जाफर अली जाफरी व नाजीया टिपू शेख यांनी हे लगड आणल्याचे कबूल केले. या कारवाईत एकूण १६ सोन्याच्या लगडी जप्त करण्यात आल्या. त्याचे वजन २८७.७ ग्रॅम व किंमत सुमारे ४० लाख २५ हजार रुपये आहे. याशिवाय मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंबींगदरम्यान ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक वाहन मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तब्बल १६ हून अधिक गुन्ह्यांत या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now