जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत वारंवार मागण्या करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील संतप्त झालेले नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सरणावर बसून आंदोलन केले. मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभार विरोधात त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवून लक्ष वेधले. दरम्यान, आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी बसविणे, स्मशान मंडपाची दुरुस्ती, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच अस्थी संकलनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे मागणी करण्यात आली होती. मात्र मागील तब्बल २०० दिवसांपासून कोणतीही कार्यवाही न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले.

दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी तत्काळ आंदोलकांची भेट घेत त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन माघे घेण्यात आले. आंदोलनात संदीप मांडोळे, गणेश पाटील, संजय जगताप, अरूण मालपाणी, डी. आर. पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व मेहरुण परिसरातील नागरिक सहभागी झाले.











