जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जम्मू-काश्मिरातील वैष्णोदेवी मंदिराला जाणाऱ्या मार्गावर भूस्खलन होऊन दरड कोसळली. त्यात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेले मुक्ताईनगर तालुक्यातील ४२ भाविक अडकल्याचे समोर आले. सुदैवाने हे सर्व जण सुरक्षित असून ४० भाविक कटरा, तर दोन महिला भाविक मंदिर परिसरात आहेत.चमकदेवबाई मिश्रीलाल राठोड व रंजना भागवत चव्हाण असे या महिलांचे नाव आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील उंबरा, पारंबी, मुर्झिरा व तालखेडा येथील ४२ यात्रेकरू २२ ऑगस्ट रोजी रेल्वेने जम्मू-कश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. कटरा येथे पोहोचून दर्शन घेत असतानाच जोरदार पावसामुळे डोंगरकडा घसरल्याने हे सर्व यात्रेकरू अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट यात्रेकरूंशी संपर्क साधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू अडकले असले तरी सर्व यात्रेकरु हे सुरक्षित असून दोन यात्रेकरू वरच्या भागात अडकले आहेत. ते देखील सुरक्षितपणे खाली आल्यानंतर सर्व यात्रेकरु परतीचा प्रवास सुरू करणार आहेत.
जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच गावातील व्यक्ती यात्रेकरूंशी सतत संपर्कात आहेत. सर्वजण सुरक्षित असल्याचे निश्चित झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. उंबरा गावातील संदीप पाटील यांनीही यात्रेकरूंशी संवाद साधून त्यांची स्थिती सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच सर्व यात्रेकरुन सुरक्षितपणे आपआपल्या घरी पोहचतील असे सांगण्यात आले आहे.











