जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२५ । दिग्गज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत आहेत. ईडीनंतर आता सीबीआय १७,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींशी संबंधित सहा ठिकाणांवर छापेमारी करत आहे. सीबीआय पथक सकाळी ७ वाजल्यापासून अनिल अंबानींच्या घरावर छापे टाकत आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवासस्थानी उपस्थित होते.

अलीकडेच अनिल अंबानींच्या मुंबईतील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती तर, आता ईडीनंतर अनिल अंबानी CBI च्या रडारवर आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येस बँकेच्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी ईडीने अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते.

दरम्यान आज सीबीआयने सहा ठिकाणावर छापेमारी केली असून या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे की रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी येस बँकेकडून कोणतीही पुरेशी हमी न घेता मोठी कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांद्वारे पैसे इतर कामांवर खर्च केले गेले. यापूर्वी, या प्रकरणात सीबीआयने दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला.












