जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विजय घोलप यांना निलंबित करण्यात आले आहे. सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म- मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला कामावर घेणे या दोन प्रकरणात निलंबित करण्यात असून तसा आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत. आता डॉ. घोलप यांची चौकशी केली जाईल.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्याविरुद्ध जून महिन्यात त्यांच्या सहकारी महिला अधिकारी यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. एवढेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर महिलेचा पती काम करत असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणाची चौकशी होऊन डॉ. घोलप यांना दोषी धरण्यात आले होते. तसा अहवाल समितीने आयुक्तांकडे पाठवला होता. एवढेच नव्हे तर मनपा आस्थापना विभागाकडून महिला अधिकारी यांच्या लैंगिक छळ प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

जन्म दाखल्यातील घोळाचे प्रकरणही आले होते समोर
माजी नगरसेवक प्रशांत सोनवणे यांनी आयुक्तांकडे पुरावा देऊन डॉ. विजय घोलप यांनी कसे नियमबाह्य पद्धतीने आडनाव, वडिलांचे नाव, जन्म दाखल्यातून बदल केल्याची तक्रार केली होती. अखेर सोमवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. विजय घोलप यांच्या चौकशीसाठी निलंबित केले आहे. आस्थापना विभागाकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. डॉ. घोलप यांच्या निलंबनानंतर आणखी काही तक्रारी समोर येऊ शकतात.












