जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ५०० रूपयांच्या नोटासंदर्भात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मात्र यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. पीआयबीने या व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक केलेय. त्यामध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आलेय.

नेमकं व्हायरल होणारा मेसेज काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांच्या एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. 75% बँकांच्या एटीएममधून 500 च्या नोटा हटवल्या जाव्यात आणि 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएममधून या नोटा पूर्णपणे बंद व्हाव्यात, असा उद्देश आहे. यानंतर एटीएममधून फक्त 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतील. त्यामुळे, तुमच्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या नोटा आता खर्च करायला सुरुवात करा, असा मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

Has RBI really asked banks to stop disbursing ₹500 notes from ATMs by September 2025? 🤔
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2025
A message falsely claiming exactly this is spreading on #WhatsApp #PIBFactCheck
✅ No such instruction has been issued by the @RBI.
✅ ₹500 notes will continue to be legal tender.
🚨… pic.twitter.com/znWuedOUT8
पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये काय?
५०० रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा दावा PIB फॅक्ट चेकने पूर्णपणे खोटा ठरवला आहे. PIB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट करत तथ्य सांगितलेय. आरबीआयने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. 500 रुपयांच्या नोटा अद्यापही कायदेशीररित्या वैध आहेत. कोणत्याही माहितीची सत्यता तपासण्यासाठी सरकारी वेबसाइट्ससारख्या विश्वसनीय स्रोतांचा वापर करावा.












