जळगाव लाईव्ह न्यूज । यावल येथील बस स्थानकात रावेरला जाणाऱ्या बसमध्ये बसताना एका महिलेच्या पिशवीतून दोन लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत महिलेने माहिती देताच चालक आणि वाहकाने बस थेट पोलिस ठाण्यात नेली. तेथे प्रवाशांची तपासणी करूनही काहीही गवसले नाही. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरू आहे.

निरूळ (ता.रावेर) येथील रहिवासी मंगलाबाई नारायण पाटील (वय ६२) ही महिला यावल तालुक्यातील भोरटेक येथे लग्नासाठी आली होती. लग्न आटोपल्यानंतर त्या यावल बस स्थानकावरून रावेर जाणाऱ्या बसमध्ये (क्र.एमएच.२०-बीएल.१७७४) बसल्या. बस आगारातून निघाली तेव्हा महिलेने आपली पिशवी पाहिली. त्यात ठेवलेल्या कानातील सोनसाखळ्या चोरीला गेल्याचे लक्षात आले.
ही माहिती त्यांनी चालक आणि वाहकास दिली. यानंतर चालकाने एसटी बस थेट यावल पोलिस ठाण्यात नेली. तेथे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण बस व प्रवाशांची तपासणी केली. पण, चोरीला गेलेल्या सोनसाखळ्या सापडल्या नाहीत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.