जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । यावल तालुक्यातील साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे सात वर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारच्या वेळेस घडली. केशा प्रेमा बारेला (वय ७) असं मयत बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत असे की, साकळी गावाजवळच्या मानकी शिवारातील पाटचारी जवळ केशा बारेला हा त्याच्या आईसोबत जात असताना अचानक हल्ला करत बिबट्याने मुलाला आईच्या हातातून खेचून नेले आणि गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, स्थानिक आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.