⁠ 
शनिवार, सप्टेंबर 28, 2024
Home | बातम्या | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं विरोधकांकडून राजकारण पण सर्वसामान्यांकडून समर्थन

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं विरोधकांकडून राजकारण पण सर्वसामान्यांकडून समर्थन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या एन्काऊंटरचे सर्वसामान्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. पोलिसांनी जेंव्हा अक्षयचा एन्काऊंटर केला तेंव्हा बदलापूरसह अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. मात्र विरोधकांकडून या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकार व पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

हैदराबादमध्ये डिसेंबर 2019 मध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊन्टर केला. या आरोपींनी 28 नोव्हेंबर रोजी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलं. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केलं. त्यानंतर मध्यरात्री घटनास्थळावर नेऊन घडलेल्या प्रकारचं रिक्रिएशन करण्याचं ठरवलं. त्यावेळी एका आरोपीनं पोलिसांचं हत्यार हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सर्व आरोपी ठार झाले. हैदराबादमध्ये झालेल्या एन्काऊन्टरचं सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पण, त्याचबरोबर मानवी हक्क संघटनांनी या एन्काऊन्टरवर संशय व्यक्त केला होता. हैदराबाद शहर पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न विचारले होते. तसाच काहीसा प्रकार बदलापूर एन्काऊंटरबाबतही होतांना दिसत आहे. हा एन्काऊंटर हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

अक्षय शिंदेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. त्यामुळे त्याची बाजू घ्यायचे कुणालाही कारण नाही. ज्यावेळी चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाले त्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये लोकांनी उत्स्फूर्त बंद पुकारत रेल्वे रोको आंदोलन केले होते. या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर सर्व राजकीय पक्षांनीही अक्षय शिंदेला फाशी देण्याची जोरदार मागणी करीत आंदोलने केली होती. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला तर पोलिसांना स्वसंरक्षणाचा अधिकार आहेच. त्यात अक्षयचा बळी गेला तर कुणाला दु:ख करण्याचे मुळीच कारण नाही.

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे हा तरुण सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. याच शाळेतील दोन चिमुकलींवर त्याने अत्याचार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना घडताच दुसऱ्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला. हजारो लोक अचानक ट्रॅकवर जमा झाले. उत्स्फूर्तपणे झालेल्या या आंदोलनात काहींनी राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्नही केला. कारण नागरिकांच्या या आंदोलनात काही राजकीय बॅनर्स देखील आले. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. या आंदोलनाच्या मागे लोक भावना नसून राजकीय हेतू असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.

बदलापूर येथील या संवेदनशील विषयावरुन झालेले राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. जेंव्हा अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती तेंव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा आंध्रप्रदेश प्रमाणे एन्काऊंटर करण्याची मागणी केली होती. सुषमा अंधारे यांचीही तशीच मागणी होती. त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र आता त्याचे एन्काऊंटर झाल्यानंतर विरोधकांनी पोलिसांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

विरोधकांकडून पोलिसांवर टीका करण्यात येत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कृतीचे ठाम शब्दात समर्थन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चकमकीतील पोलिसांना बक्षीस जाहीर केले. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पोलीस कारवाईचे समर्थन केले. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह चकमकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली.

सोशल मीडियावर “देवाचा न्याय” या नावाने एक हॅशटॅग ट्रेंड झाला. पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन चिमूरड्यांना न्याय मिळाल्याची भावना सामूहिक रित्या व्यक्त झाली. मात्र त्याच उलट या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून करण्यात येत असल्याने सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटतांना दिसत आहेत. अक्षय शिंदेवर कडक कारवाई व्हावी म्हणून महिनाभरापूर्वी आंदोलन करणाऱ्या सुषमा अंधारे या पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप करीत आहेत. अक्षय शिंदे याला अन्यत्र देण्यात गृह खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. मविआचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पोलिसांवर संशय व्यक्त करणाऱ्या आहेत.

मुळात अक्षय शिंदे याने केलेले कृत्य इतके विकृत होते की, त्याच्याबद्दल सहानुभूती कशी असू शकते ? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबद्दल इतका पुळका कसा राहू शकतो ? हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस, पोलीस यंत्रणा आणि महायुती सरकार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. इतक्या संवेदनशील विषयात राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहेत.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.