तुम्हाला माहितीये का ? 1992 मध्ये कशी होती कररचना, 30 वर्षे जुना टॅक्स स्लॅब होतोय व्हायरल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. यापूर्वी सोशल मीडियावर मोटारसायकल, सायकल, सोन्याचे दर, गव्हाचे दर आणि रेस्टॉरंटचे बिल यांसह अनेक जुनी बिले आणि पावत्या व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. आता अशातच 1992 च्या अर्थसंकल्पातील नवीन आयकर स्लॅबचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

1992 च्या अर्थसंकल्पात नवीन कर स्लॅब
खरंतर, indianhistorypics या नावाच्या हँडलवरून हे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहे. हे 30 जानेवारी रोजी पोस्ट केले होते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – 1992 च्या बजेटमध्ये नवीन आयकर स्लॅब.

त्यावेळी टॅक्स स्लॅबमधील 28,000 हजार रुपयांवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. 28001 हजार ते 50000 रुपयांवर 20 टक्के कर भरावा लागत होता. 50001 ते 100000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आणि 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 40 टक्के आयकर भरावा लागतो.

स्लॅब तीन भागांमध्ये विभागलेला
हे चित्र त्यावेळचे आहे जेव्हा 1992 मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमधील अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी टॅक्स स्लॅबचे तीन भाग केले होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकजण नुकताच सादर केलेल्या बजेटशी तुलना करू लागले.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. यावेळी सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही.