⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

‘त्या’ नगरसेवकांची भाजपला सोडून राजकीय आत्महत्या ; गिरीश महाजनांचा नगरसेवकांना खडेबोल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला गळती लागली आहे.  जळगाव मनपातील 30 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय आत्महत्या केल्याच म्हणत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी नगरसेवकांना खडेबोल सुनावले. लवकरच भाजपमधून फुटून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला जोरदार धक्के दिले असून शनिवारी भाजपचे तीन नगरसेवक फोडल्यानंतर रविवारी भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या उर्वरित २७ नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सर्व २७ नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला गिरीश महाजन यांनी सर्व नगरसेवकांना त्यांची पक्षाबद्दल असलेली नाराजी व्यक्त करण्याचे जाहीरपणे सांगितले. तसेच ज्या नगरसेवकांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी नाराजीचे कारण देखील सांगावे, असेही महाजन यांनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितले. पक्षाने ज्या नगरसेवकांवर विश्वास टाकला, त्या नगरसेवकांनी पक्षाचा विश्वासघात करून आपल्या पायावर धोंडा मारण्याचे काम केले आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वच यामुळे धोक्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच कामकाज करून, त्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.