जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । एरंडोल येथील बस आगाराच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत २७८ एसटी कर्मचारी कामावर परतले असून राहिलेले दहा कर्मचारी सुद्धा एक-दोन दिवसात केंव्हाही कामावर येऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व बस सेवा सुरळीत झाल्या आहेत. मंगळवारी १९ एप्रिल रोजी पाच लाखाच्यावर उत्पन्न आले आहे अशी माहिती एरंडोल बस आगाराचे आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांनी दिली.
एरंडोल व धरणगाव तालुक्यात ग्रामीण भागासह इतर सर्व बस सेवा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या आगारात एकूण ५४ बस गाड्या असून सर्व गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. ग्रामीण बस गाड्या २५, लांब पल्ल्याच्या ५ मध्यम पल्ल्याच्या दहा, आंतरराज्य सेवा तीन याप्रमाणे बस सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. प्रवासी वर्गाने पूर्ववत राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडीनेच सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन बस आगार प्रशासनाने केले आहे.
दरम्यान जवळपास सव्वा पाच महिन्याच्या काळात एसटी व कर्मचारी, एसटी व प्रवासी यांच्यातला दुरावा वाढला होता तो आता संपण्याच्या मार्गावर आहे म्हणून एसटी कर्मचारी सुद्धा नव्या जोमाने व उत्साहाने कामाला लागले आहेत प्रवासी वर्ग सुद्धा पहिल्यासारखा एसटीकडे आकर्षित हळूहळू होत असल्याचे दिसून येत आहे. एसटी बस ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन मानली जाते. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे तसेच ठिकठिकाणी भरणाऱ्या यात्रा पाहाता उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात अनुकूलता आहे त्या स्थितीचा फायदा घेतला जाऊ शकतो. तसेच एरंडोल बस स्थानक आवारा ची दुर्दशा त्वरित संपवावी अशी मागणी होत आहे बस स्थानकावरील सफाई दिवसभरातून नियमितपणे व्हावी तसेच महिला व पुरुष प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृह मधील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे याशिवाय बस स्थानकावरील शोपीस ठरत असलेले पंखे कधी चालू होणार याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे इतर प्रवाशांसाठी च्या सुद्धा सुविधा पुरवण्याची नितांत गरज आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीबरोबर प्रवाशांसाठी असलेल्या प्राथमिक सुखसुविधा पुरवण्याची एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे.