⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महापालिकेचा गरिब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ; २० शाळा पडल्या (पाडल्या) बंद

महापालिकेचा गरिब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ; २० शाळा पडल्या (पाडल्या) बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ जानेवारी २०२३ | जळगाव महापालिका भ्रष्ट कारभार, घोटाळे, सोईचे राजकारण, खराब रस्ते, धुळ व मुलभुत सुविधांचा आभाव आदी कारणांमुळे बदनाम झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक आणि अधिकारी यांच्यातील आपआपसातील वादांमुळे जळगाव शहराचा विकास खुंटला आहे, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. जळगावचा हा रखडलेला विकास येणार्‍या काळात भरुन निघेल देखील (प्रविण गेडाम यांच्या सारखे चांगले अधिकारी व नरेंद्र अण्णा यांच्या सारखे निष्कलंक लोकप्रतिनीधी लाभल्यानंतर) मात्र गरीब मुलांच्या एका संपूर्ण पिढीचे नुकसान होतेय त्याच काय? या गंभीर विषयावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे, गेल्या काही वर्षात महापालिकेच्या तब्बल २० शाळा बंद पडल्या आहेत. या शाळांमध्ये सुविधा नाहीत, गुणवत्ता नाही, डिजिटल शिक्षण नसल्याने गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहत आहेत.

जळगाव शहरात सेमी इंग्रजी, कॉन्व्हेंट, सीबीएससीच्या शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक शाळांमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पालकांना धावपळ देखील करावी लागते. ही शहराच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने निश्‍चितपणे स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याचवेळी महापालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे. महापालिकेच्या शाळा एकामागून एक बंद पडत आहेत. विद्यार्थी पटसंख्या नसल्याने आधी काही वर्ग बंद पडले आता शाळाच बंद पडत आहेत. महापालिकेकडून उपलब्ध माहितीनुसार, अलीकडच्या काही वर्षांमध्ये शहरातील तब्बल २० शाळा बंद पडल्या आहेत. जर या शाळांना विद्यार्थी मिळत नसतील, तर त्यात दोष कुणाचा? याचा शोध कोण व कधी घेणार.

शाळेची फी न भरल्यामुळे शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडत बाहेर बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यातच समोर आला होता. जिल्हाधिकार्‍यांनी याची चौकशी देखील सुरु केली आहे. पालक आर्थिक कसरत करुनही आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवित आहेत. अगदी झोपडपट्टी भागातील मुलं देखील खासगी शाळांची वाट धरत आहेत. यामुळे महापालिकेच्या शाळांना विद्यार्थी मिळत नाहीऐ. परंतू असे का होतेय? राज्यातील अनेक महापालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. काही शाळा डिजिटल झाल्या आहेत. हे जळगाव महापालिकेला का जमत नाहीए? जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत २०१७ साली ४३ शाळा सुरू होत्या. यापैकी आता डिसेंबर २०२२ अखेर २३ शाळाच सुरू असल्याची नोंद आहे. म्हणजे मनपा क्षेत्रातील तब्बल २० शाळा बंद झाल्याची धक्कादायक परिस्थिती शहरात आहे.

महापालिकेच्या या शाळांमध्ये एकूण चार हजार ५४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण २० इमारती आहे. याच इमारतींमध्ये सध्या या शाळा सुरू आहे. तर याच इमारतींमध्ये काही खासगी शाळादेखील सुरू आहे. या शाळांमध्ये पहिली ते पाचवीत तीन हजार १०६ विद्यार्थी आहे, तर त्यांना शिकविण्यासाठी प्रति ३० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षकप्रमाणे १०४ शिक्षक आहे, तर सहावी ते आठवीत एक हजार ४४२ विद्यार्थी आहे आणि त्यांना शिकविण्यासाठी प्रति ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाणे ४१ शिक्षक आहे. यानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील शाळांमध्ये १४७ शिक्षक तर तीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांना वेतनासाठी दर महिन्याला महापालिकेच्या तिजोरीतून ४७ ते ५० लाखांचा निधी खर्च होतो. मात्र गुणवत्तेचे मुल्यमापन होते का? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.