धक्कादायक! महाराष्ट्रातील ११ हजार गावांना टीबीचा धोका; जळगावातील तब्बल ‘इतके’ गावे ‘हाय रिस्क’वर?

एप्रिल 28, 2026 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशाला क्षयरोगमुक्त (TB-Free) करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत महाराष्ट्राबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आधुनिक ‘एआय’ आधारित VMTB टूलच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ११,०९१ गावे टीबीच्या ‘हाय रिस्क’ श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

tb

२४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६,१११ नवीन क्षयरोगी आढळले आहेत. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील ३८३ गावांचा या अतिधोकादायक गावांच्या यादीत करण्यात आला आहे.

टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये तो केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित राहत नाही आणि पाठीचा कणा, मेंदू आणि किडनी यांसारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे टीबीचं निदान तो गंभीर रूप घेण्यापूर्वीच करावं.

कोणत्या जिल्ह्यात किती हाय रिस्क गावं?
यवतमाळ ५३९, अमरावती ५०४, नाशिक ४८८, रायगड ४८८, नागपूर ४८२, पुणे ४७९, चंद्रपूर ४६७, सातारा ४४२, गडचिरोली ४३३, नांदेड ४०४, अहिल्यानगर ४०१, रत्नागिरी ३८८, जळगाव ३८३, बुलढाणा ३६४, वर्धा ३५३, बीड ३४४, छत्रपती संभाजीनगर ३३९, कोल्हापूर ३१०, सोलापूर २९१, अकोला २४९, जालना २४२, गोंदिया २३९, लातूर २३८, नंदुरबार २३८, पालघर २३१, भंडारा २२६, परभणी २१२, ठाणे २१२, वाशिम १९८, सिंधुदुर्ग १८९, धाराशिव १८५, सांगली १८४, हिंगोली १७८, धुळे १७१

काय आहेत टीबीचं लक्षणं?
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला
छातीत दुखणं
खोकल्यातून रक्त किंवा थुंकी पडणं
सतत अशक्तपणा
कोणत्याही कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणं
ताप आणि रात्री खूप घाम येणं

टीबीची चाचणी कशी केली जाते?
टीबीचे निदान करण्यासाठी, डॉक्टर विविध चाचण्या करतात. या चाचण्या कोणत्या आहेत ते पाहूयात
त्वचा किंवा रक्त चाचणी- त्वचा आणि रक्त चाचण्यांद्वारे शरीरात टीबीचे बॅक्टेरिया आहेत की नाही हे पाहिलं जातं.
थुंकी चाचणी- यामध्ये टीबीचे जिवाणू ओळखण्यासाठी रुग्णाच्या थुंकीची तपासणी केली जाते. टीबीचं निदान करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची चाचणी मानली जाते.
छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन- या दोन्ही चाचण्यांद्वारे फुफ्फुसांची स्थिती तपासली जाते. यावरून छातीत टीबी किती प्रमाणात पसरला आहे याची माहिती मिळते.

टीबीवर उपचार कसे केले जातात?
टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णाने आपला उपचार योग्यरित्या पूर्ण करणं आणि ६ ते ९ महिने नियमित औषधे घेणं गरजेचं आहे. उपचारांमध्ये एकाच वेळी अनेक अँटीबायोटिक्स दिली जातात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now