जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्याने रौद्र रूप धारण केले असून तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेल्यानं उष्णतेने जळगावकर होरपळून निघत आहे. या कडाक्याच्या उन्हाचा परिणाम आता जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या हतनूर धरणामधील जलसाठ्यावरही दिसू लागला आहे. भीषण उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून, पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

हतनूर धरण हे जळगाव जिल्ह्यासह काही विदर्भ भागांसाठी जीवनवाहिनी मानले जाते. मात्र, यंदा वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाद्वारे कमी होत आहे. यंदा बाष्पीभवनाचा वेग इतका वाढला आहे की, दररोज मोठ्या प्रमाणात जलसाठा वाफेच्या रूपात हवेत विरघळत आहे. सध्या दररोज सरासरी ०.३३ दलघमी पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याची नोंद आहे.

गेल्या वर्षी २७ एप्रिल २०२५ रोजी धरणात ४५.१० टक्के साठा होता, जो यंदा २७ एप्रिल २०२६ रोजी ४०.७८ टक्क्यांवर खाली आला आहे. सुमारे तीन टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. जिवंत जलसाठ्यातही तब्बल ११ दलघमींची तूट निर्माण झाली आहे.
हतनूर धरणावर दीपनगर औष्णिक वीज केंद्र, भुसावळ रेल्वे, संरक्षण दलाचे कारखाने यासह भुसावळ नगरपालिका आणि रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील शेती अवलंबून आहे. एप्रिलअखेर साठा ४० टक्क्यांवर आल्याने आगामी मे आणि जून महिन्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. जर उन्हाचा तडाखा असाच कायम राहिला, तर जिल्ह्याला पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागू शकतो.








