जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना, दुसरीकडे जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. पिंप्राळ्यातील ओमकार पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाला चक्क मातीमिश्रित आणि कचरायुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित आहे. नळ सोडल्यानंतर सुरुवातीला गडद मातीच्या रंगाचे पाणी येते, ज्यामध्ये कचरा आणि वाळूचे कणही आढळत आहेत. हे पाणी पिणे तर दूरच, साध्या घरगुती वापरासाठीही अयोग्य असल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भरउन्हात भटकंती करावी लागत आहे. नाइलाजास्तव नागरिकांना पाण्याचे विकतचे जार घ्यावे लागत आहेत. महिन्याकाठी पाण्यासाठी हजारो रुपये अतिरिक्त खर्च करावे लागत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.
परिसरातील जलवाहिनी कुठेतरी फुटली असावी किंवा सांडपाण्याची लाईन त्यात मिसळली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ या भागातील जलवाहिनीची तपासणी करून दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली आहे.









