जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून अशातच नोकरीसंदर्भातील स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी २००० हजाराची लाच स्वीकारताना पारोळा कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज, २८ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले. विजय प्रकाश वाघ (वय ४२) असं संशयित आरोपीचे नाव असून या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
कुटीर रुग्णालय, पारोळा येथील सहाय्यक अधीक्षक विजय वाघ याने एका तक्रारदाराकडे त्यांच्या नोकरीसंदर्भातील ‘स्थायी आदेश’ मिळवून देण्यासाठी ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तडजोडीअंती २,००० रुपये स्वीकारण्याचे ठरले. आज पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विजय वाघ याने तक्रारदाराकडून २,००० रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी आरोपीकडून लाचेच्या रकमेसह २३० रुपये रोख आणि एक व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.










