जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२३ । मुक्ताईनगर पंचायत समिती येथील मनरेगा योजनांची कामे पाहणाऱ्या तब्बल ११ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत दिलेल्या मौखिक सुचनांनुसार गटविकास अधिकारी यांनी हि कारवाई करत सर्व अकरा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील काही लाभार्थ्यांकडुन आमदार पाटील यांच्या कडे प्राप्त तक्रारी नुसार, रमाई, शबरी, पीएम आवास योजनेंतर्गत घरकुल फाईल तसेच गोठा बांधकाम फाईल पुढे सरकविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडे सर्रासपणे पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप तालुक्यातील काही ठिकाणी लाभार्थ्यांकडुन करण्यात आले होते.गोठा बांधकाम साठी तब्बल पाच हजारांची लाच मागितली जात होती.
दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या मौखिक सुचननेप्रमाणे हि कारवाई केली करण्यात आली. राजु बाबुराव पवार (ए पी ओ),मुकुंदा संतोष पाटील (टि पी ओ), रविंद्र रमेश दाते (टि पी ओ), म.ग्रा.ह.योजना विभाग पंचायत समिती मुक्ताईनगर तसेच घरकुल विभागातील अश्वजित उत्तम बोदडे (सी डी ई ओ), सागर पांडुरंग कोळी (आर एच ई), विवेक पंडित पाटील (आर एच ई), परमेश्वर श्रीकृष्ण खवले (आर एच ई), किशोर भीकन पाटील (आर एच ई) आणि स्वच्छ भारत मिशन विभागातील गजानन समाधान सुरवाडे (सी आर सी) यांच्यासह आणखी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असल्याची माहिती आहे.
पंचायत समितीतील आजवरची हि सर्वात मोठी कारवाई असुन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.तालुक्यातील काही लाभार्थ्यांकडुन या कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर काहींमध्ये असंतोषही व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र तालुक्यातील जनतेची कामे पुर्णपणे खोळंबली असून नवीन कर्मचारी कामावर रुजू होईपर्यंत मनरेगाच्या कामे बंद राहणार आहे.