⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सर्वसामान्यांची नाशिक शटलसह पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच; रेल्वेची मनमानी का जळगाव जिल्ह्यातील खासदारांची निष्क्रियता?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असल्याने कोरोनापूर्व स्थितीकडे वाटचाल सुरु झाली आहे. यामुळे आजमितीला आंतरराष्ट्रीय विमानसेवांसह सर्वकाही सुरु झाले आहे. बंद आहे केवळ सर्वसामान्यांच्या पॅसेंजर रेल्वे! गत दोन वर्षांपासून बंद असलेली नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. भुसावळ डिव्हीजनचे अधिकारी म्हणतात या गाड्या सुरु करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे. तर त्यावर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे ठरलले उत्तर म्हणजे, आमचा पाठपुरावा सुरु असून लवकरच या गाड्या सुरु होतील. मात्र सहा महिन्यांपासून खासदारांकडून केवळ खोटी आश्‍वासने मिळत आहेत. या प्रकाराला रेल्वेची मनमानी म्हणायची का खासदारांची निष्क्रियता? असा प्रश्‍न आता उपस्थित होवू लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली तेंव्हापासून नाशिक देवळाली शटलसह भुसावळ – मुंबई पॅसेंजर गाडी बंद झाली. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. पॅसेंजर गाड्यांमुळे केवळ चकारमन्यांचीच प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांच्याही प्रवासाची सोय होणार आहे. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत दीड वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. आता सर्वच खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.
या विभागांतर्गत नाशिक देवळाली शटलसह भुसावळ-मुंबई पॅसेंजर या दोन गाड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या गाड्या त्वरीत सुरु होण्याची अपेक्षा आहे. याचा सरकार व रेल्वे प्रशासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

प्रवाशांच्या गैरसोईकडे लोकप्रतिनिधींचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. वर्षभरातील अनुभव पाहता सर्वसामान्यांना केवळ खोटा दिलासा देण्यासाठी व सोपास्कार पार पाडण्यासाठी आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केवळ राज्य सरकार व केंद्र सरकारला केवळ निवेदन देत वेळ मारुन नेली आहे. या विषयावर केवळ खोटी आश्‍वासनेच देण्यात येत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत असतांना हे लोकप्रतिनिधी कुठे लपून बसले आहेत, याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. रेल्वेची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडले जात आहेत. जेंव्हा रेल्वेसेवा पूर्ववत होण्याचा निर्णय होईल तेंव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी व आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यासाठी अनेजण पुढे येतील. त्यावेळी त्यांनी त्याचे श्रेय जरुर घ्यावे मात्र आता त्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जर देशात लांब पल्ल्यांच्या गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यातून कोरोनाचा प्रसार होत नाही मग का केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोना कसा पसरेल? याचे खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षण करुन कोरोनापूर्व काळाप्रमाणे रेल्वेसेवा पूर्ववत झालीच पाहिजे.