⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अमृत महोत्सव लेखनमाला : “दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल?”

सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- १

पारतंत्र्याच्या विरोधात सातत्याने एक हजार वर्षे सशस्त्र संघर्ष करण्याचं फळ; म्हणजे आपले अखंड भारतवर्ष दोन भागात विभाजित होऊन ‘स्वतंत्र’ झाले. पारतंत्र्याची साखळी तोडण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात हे युद्ध लढल्या गेले. वीर योद्ध्यांनी, क्रांतिकारकांनी, संतांनी आश्रमांनी तसेच कित्येक गुरूकुलांनी; विदेशी व विधर्मी शासकांना आपल्या मातृभूमीतून मुळासहीत उपटून टाकण्यासाठी आपले बलिदान दिले. माता-भगिनींनी तर जळत्या आगीत उडी मारून जौहर केले. पारतंत्र्याच्या या कालखंडात लाखो देशभक्त युवक फासावर गेले. वास्तविक पाहतां; आपला इतिहास पारतंत्र्याचा नसून पारतंत्र्याच्या विरोधातील सशस्त्र संघर्षाचा वीरव्रत इतिहास आहे.

सम्राट दाहिर, बप्पा रावल, राणा सांगा, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह, राजा छत्रसाल, सुहेल देव, १८५७ चे महान योद्धे वासुदेव बळवंत फडके, सतगुरु रामसिंह, स्वा. सावरकर, सरदार भगतसिंह, सुभाष चंद्र बोस आणि डॉ. हेडगेवार यांच्यासहीत लाखो क्रांतिकारक आणि कोट्यावधी देशवासियांनी स्वातंत्र्यदेवतेचं शिर आपल्या रक्ताने शुचिर्भूत केलं आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात पाच लाखांहून अधिक देशभक्त नागरिकांनी इंग्रजांशी लढत असतांना आपले बलिदान दिले. साम्राज्यवादी ब्रिटीश राजवटीला हादरून सोडणाऱ्या या हुतात्म्यांना विसरणं म्हणजे महापाप व ऐतिहासिक अन्याय होईल. भारताचं असं कुठलंही गाव नसेल जिथून कुणी हुतात्मा झालं नसेल. अत्याचारी, विदेशी-विधर्मी व निरंकुश शासकांची सत्ता पालटण्याठी वीरांगना स्त्रियांनी सुद्धा आपली तलवार, बंदूक आणि बाँबसहीत रक्ताने होळी खेळली आहे.

पारतंत्र्याचा डाग मिटवण्यासाठी, इंग्रजांच्या विरुद्ध युद्धात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून राष्ट्रभक्त क्रांतिकारक युवकांनी आणि अनेक संस्थांनी सशस्त्र प्रतिकाराला आणखी प्रशस्त करण्यासाठी हत्यारे उचलली होती. क्रांतिकारक संघटना, अनुशीलन समिती, बब्बर खालसा, हिंदुस्तान समाजवादी प्रजातांत्रिक सेना, अभिनव भारत, आर्य समाज, हिंदू महासभा, आजाद हिंद सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रवादी लेखक व कवींची तसेच वीररस लिहिणाऱ्या साहित्यकारांची मुख्य भूमिका लाथाडून, समग्र स्वातंत्र्यसंग्रामाला एकाच नेत्याच्या व एकाच पक्षाच्या खात्यात जमा करण्याचा अक्षम्य गुन्हा सुद्धा याच देशात घडला आहे.

हे घोर कुकृत्य त्या तथाकथित लोकांनी केलं आहे, ज्यांनी; आपला प्राण तळहातावर घेऊन स्वातंत्र्यसंग्रामाला धार देणाऱ्या क्रांतिकारकांना पथभ्रष्ट शिवाय माथेफिरू म्हणत अवहेलना केली. हे तेच लोकं आहेत, जे हातात भिकेची वाटी घेऊन इंग्रजांकडून स्वातंत्र्याची भीक मागत राहिले. भारताच्या विभाजनासाठी जबाबदार हेच लोकं आहेत, ज्यांनी लाखो बलिदानांना मातीमोल करत दिल्लीत गाजावाजा केला, कि “दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल__________दागी न कहीं तोप ना बन्दूक चलाई__________दुश्मन के किले पर भी ना की तूने चढ़ाई__________” या गीतातून अशाप्रकारचे भाष्य करतांना, ‘चुटकी में दिया दुश्मनों को देश से निकाल’, असं म्हणत गीतकाराने; तब्बल एक हजार वर्षांपर्यंत चालत आलेल्या सशस्त्र संग्रामाला चिमटीत पकडून इतिहासाच्या कचरापेटीमध्ये फेकून दिले.

अखंड भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षांपर्यंत बलिदान देणाऱ्या वास्तविक सैनिकांसोबत विश्वासघात करून भारताला खंडित करत, तथाकथित स्वातंत्र्याचं सगळं लोणी चाटणारे लोक आजही जेव्हा ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ हे गीत ऐकतात किंवा ऐकवतात तेव्हा अक्षरश: काळीज फाटतं. कल्पना करा, कि फाशीच्या दोरखंडाला लटकणाऱ्या क्रांती-योद्ध्यांची आत्मा किती तळमळत असेल! हे गीत वास्तविकतेत सरदार उधम सिंह, वीर सावरकर, रास बिहारी बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, खुदीराम बोस, चाफेकर बंधू तसेच सुभाष चंद्र बोस इत्यादींचा अपमान करून त्यांची खिल्ली उडवणारं आहे. हे गीत; बॉंब, बंदूक, तलवारींना निकामी सांगत ‘भिकेच्या वाटीला’ भारतरत्न देणारं आहे.

ही बाब उल्लेखनीय आहे, कि एक हजार वर्षांच्या विदेशी अधिपत्याला भारताच्या राष्ट्रीय समाजाने एक दिवसही स्वीकारले नाही. स्वातंत्र्याचे युद्ध लढत असतांना प्रत्येक पीढी, येणाऱ्या पीढीच्या हातात स्वातंत्र्यसंग्रामाची लगाम सोपवून निघून गेली. पण जेव्हा ही लगाम एका कट्टरपंथी इंग्रज ईसाई पादरी ‘ए ओ ह्यूम’द्वारे स्थापन केलेल्या एका पक्षाच्या हातात पडली, तेव्हा लाचारासारखं स्वातंत्र्याची भीक मागणारी भ्याड मनोवृत्ती जन्माला आली आणि याचं फळ म्हणजे; अतिप्राचीन आर्य राष्ट्राला कापून पाकिस्तान बनवण्यात आले. विश्वाच्या नकाशावर साकारण्यात आलेला हा पाकिस्तान; भारतावर झालेल्या इस्लामिक आक्रमणांच्या विजयाचा विजय स्तंभ आहे.

‘विना धोप आणि विना ढाल स्वातंत्र्य’ असा दावा करणाऱ्या अहिंसक योद्ध्यांना विचारल्या जावं, कि आपल्या पक्षाच्या किती नेत्यांना इंग्रजांनी फासावर लटकावलं? एकही नाही. किती खादीधारकांनी; वीर सावरकर, भाऊ परमानंद अशा शेकडो क्रांतिकारकांसारख्या काळ्या पाण्याच्या (अंदमानच्या कारागृहात) अमानवी यातना सोसल्या? एकानेही नाही. लाला लजपतराय यांना सोडून किती श्वेतपोशी नेत्यांनी इंग्रज पोलिसांच्या लाठीस झेलले? एकानेही नाही. याच श्वेतश्रेणीच्या किती नेत्यांनी भारताच्या विभाजनाला विरोध करून स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवण्याची हिंमत केली? एकानेही नाही. क्रांतिकारकांच्या हौतात्म्याला दुर्लक्षित करणाऱ्यांना हे सुद्धा विचारल्या जावं, कि त्यांनी सरदार भगत सिंह इत्यादी युवा क्रांतिकारकांचा विरोध का केला? जे, कि हेच युवा; स्वातंत्र्ययोद्धा महात्मा गांधीजींना एक महान नेता म्हणून सम्मान देत राहिले.

सत्याग्रह करून कारागृहात जाणे; हा एक कौतुकास्पद प्रयत्न होता. यात चुकीचं काहीही नव्हतं, परंतु असं म्हणणं, कि केवळ त्यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळालं; हे मुळात निंदनीय आहे. अहिंसावादी सत्याग्रह करणाऱ्यांना वास्तविक स्वातंत्र्यसैनिक म्हणणं, हा उपहासाचा विषय आहे. ‘१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम’ नामक जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि अंदमानच्या कारागृहात एकूण ९ वर्षांपर्यंत यातना सहन करणाऱ्या वीर सावरकरांच्या शब्दांत; ‘स्वाधीनता संग्रामाचे पूर्ण श्रेय कांग्रेसच्या, आपल्या आणि गांधीजींच्या खांद्यावर लादणे; देशाच्या त्या असंख्य हुतात्म्यांवर केवळ अन्याय करणेच नसून किंबहुना आपल्या राष्ट्राच्या पुरुषार्थाला नष्ट करणारा; शिवाय समग्र भारताच्या पराक्रमाला समूळ उपटून टाकणारा राष्ट्रघातक प्रयत्न सुद्धा आहे.’

हे एक ऐतिहासिक सत्य आहे, कि क्रांतिकारकांद्वारे केल्या गेलेऱ्या बाँबहल्ल्यांनी संपूर्ण देशात क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या युवकांनी फासावर चढत ब्रिटीश राजवटीच्या अत्याचाराला जनमानसापर्यंत पोहोचवले. या सशस्त्र क्रांतीने भारतीय सेनेतही इंग्रजांविरुद्ध वातावरण बनवलं, ज्याचं फळ म्हणजे; सेनेत विद्रोह निर्माण झाला आणि हिंदू सैनिकांच्या बंदूकांचे मुख इंग्रजांकडे वळले. तिकडे आजवर इंग्रजांना सहकार्य करणाऱ्या राजांनी सुद्धा ब्रिटीश राजवटीच्या हो मध्ये हो मिळवण्याच्या प्रक्रियेला तिलांजली देण्यास सुरूवात केली. शहरांपासून ग्रामीण क्षेत्रांपर्यंत इंग्रजांसोबतच्या फितुरीचे स्वर जागृत होऊ लागले. याच कारणामुळे इंग्रजांना भारतातून पळून; किंवा असं म्हणुया, कि आपला जीव वाचवून आपल्या घरी परतावे लागले.

त्या वेळचे इंग्रज प्रधानमंत्री एटली यांनी ब्रिटीश संसदेत चर्चिल यांच्याद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, कि “ब्रिटीश सरकारच्या भारताला सत्ता सोपवण्यामागे दोन कारणे आहेत. पहिलं हे, कि भाड्यावर देशहित विकल्या जाणारी भारतीय सेना आता इंग्रजांसोबत इमानदार राहिलेली नाही. शिवाय दुसरं हे, कि ब्रिटीश सरकार भारताला आपल्या पंज्यात दाबून ठेवण्यासाठी एवढं विशाल इंग्रजी सैन्य उभं करण्याकरिता असमर्थ आहे.”

भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती करणारे एटली साहेब एका ठिकाणी असंही म्हणाले होते, कि, “आम्ही १९४२च्या आंदोलनामुळे भारत नाही सोडला. आम्ही भारत सोडला; तो नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यामुळे. नेताजी आपल्या सैन्याबरोबर मार्गक्रमण करत इंफाळपर्यंत गेले होते. त्यानंतर लगेच नौसेना आणि वायुसेना यांच्यातही विद्रोह निर्माण झाला होता.” अर्थातच; इंग्रजांनी चरख्याच्या घूं-घूं आवाजामुळे किंवा सत्याग्रह करणाऱ्यांच्या दबावामुळे भारत सोडला नव्हता. इंग्रजांनी भारत सोडला, तो भारतीयांचा मार खाऊनच!

यात कसलंही दुमत नाही होऊ शकत, कि स्वातंत्र्यसंग्रामात ९०% सहभाग सशस्त्र योद्ध्यांचाच होता. दुसऱ्या महायुद्धात विजयी होऊनही ब्रिटीश साम्राज्यवादाच्या चिरकांड्या उडाल्या होत्या. एक वेळ अशी आली, कि अर्ध्याहून जास्त जगावर आपली सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटेनचे सैन्य व आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जर दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांचा पूर्णत: विरोध करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेताजी सुभाष चंद्र बोस यांना साथ देत अभिनव भारत, आर्य समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊन स्वातंत्र्यसंग्रामाला पुढे चालवलं असतं, तर भारताचं विभाजन अशक्य होतं. पण असं काहीही झालं नाही. समग्र काँग्रेस; विशेषत: पं. जवाहरलाल नेहरूंचा राजनैतिक स्वार्थ इथे आड आला. पं. नेहरू नेताजींसमोर कमी पडायचे. म्हणून त्यांनी राष्ट्रहिताला तिलांजली देत नेताजींचा विरोध केला आणि देशाच्या विभाजनाचा स्वीकार केला.

इंग्रजांच्या छातीत पहिली गोळी मारणाऱ्या मंगल पांडेंपासून आजाद हिंद सेनेद्वारे ब्रिटीश सत्तेवर अंतिम आणि निर्णायक प्रहारापर्यंतच्या समग्र स्वातंत्र्यसंग्रामाला भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जायला हवं होतं, मात्र खंडित भारताची सत्ता काबीज करणाऱ्या इंग्रजभक्त शासनाने या इतिहासाला पूर्णत: नकार देऊन स्वातंत्र्यसंग्रामाला एकाच नेत्याच्या आणि एकाच दलाच्या स्वाधीन केले. परिणामस्वरुप; जवळपास १५० वर्षांपर्यंत भारतीयांना डांबून ठेवणाऱ्या इंग्रजांचा काँग्रेसने सन्मानपूर्वक टिळा लावून निरोप घेतला. नाहीतर असे क्रूर शासक भारताच्या भूमीवरच कुत्र्याच्या मृत्युसमान मारले गेले असते.

क्रमश:

नरेंद्र सहगल 
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार.

मराठी अनुवाद – अविनाश काठवटे