---Advertisement---
गुन्हे विशेष

लुटारू भिशीत १ लाखांच्या लालसेने अडकताय तरुण, भिशी घेणाऱ्यांची टोळी सक्रिय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी | जळगावात लुटारू गँगकडून चालविल्या जाणाऱ्या लिलाव आणि लकी ड्रॉ भिशीत अनेक तरुण आणि गरजू अडकत आहेत. जळगावात १०० पेक्षा अधिक जण भिशी घेत असले तरी सर्वच कर चुकवे आहेत. लुटारू भिशी अनधिकृत असली तरी आजवर जळगावात कोणावरही कारवाई झालेली नाही. शहरात एक मोठ्या भिशीत नागरिकांना ३ हजारांच्या बदल्यात १ लाखांचे आमीष दाखविले जात असल्याने ते त्यात अडकत आहेत.

bhishi jpg webp webp

पहिल्या भागात आपण भिशीचे तीन भाग जाणून घेतले. त्यात भिशीचे साधारणतः तीन प्रकार असतात. एक म्हणजे गल्लोगल्ली, मित्रांमध्ये खेळली जाणारी नियमित भिशी. दुसरी म्हणजे जमलेल्या रकमेतून लिलाव करून काही रक्कम कमी स्वीकारली जाणारी लिलाव भिशी. तिसरा प्रकार म्हणजे लकी ड्रॉ भिशी. आपला क्रमांक आला की पुढील रक्कम देणे बंद करायचे अशी ती लिलाव भिशी असते.

---Advertisement---

जळगावात अनेक ठिकाणी अनधिकृत भिशी घेतली जात असून बहुतांश भिशी घेणारे मातब्बर व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, दोन नंबर धंदेवाले, सावकार सक्रिय आहेत. मुख्यत्वे बळीराम पेठ, साईबाबा मंदिर, तहसील कचेरी जवळील परिसर, महात्मा फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, गोलाणी मार्केट याच परिसरातून सर्व भिशी चालवल्या जातात. कोणतीच भिशी नियमात नसल्याने शासकीय कर तर चुकवलाच जातो शिवाय महसूल देखील बुडतो. पोलीस आणि जिल्हा उपनिबंधकांना कारवाईचे अधिकार असताना देखील आजवर कोणत्याही भिशी चालकावर कारवाई झालेली नाही.

जळगावात सुरू असलेल्या एका लकी ड्रॉ भिशीत तरुण आणि गरजूंना ३ हजार रुपये गुंतवणूक करून १ लाख मिळविण्याचे आमीष दाखविले जात आहे. एका भिशीत प्रत्येक सदस्याला दरमहा ३ हजार रुपये गुंतवणूक करायची आहे. भिशीत १५०० सदस्य असून ३५ महिने गुंतवणूक करायची आहे. भिशीमध्ये पैसे भरल्यावर जर आपली भिशी लागली तर पुढील पैसे भरण्याची आवश्यकता नसते. विजयी सदस्याला ९९ हजार रुपये देण्यात येतात. ३५ महिने पैसे भरल्यावर देखील सदस्याची भिशी न लागल्यास त्याला गुंतवणूक केलेले १ लाख ५ हजार रुपये परत दिले जातात.

मुळात भिशी १५०० सदस्यांची असल्याने एकच वेळीस प्रत्येकी ३ हजार याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा होतात. विजयी सदस्याला ९९ हजार दिल्यानंतर भिशी चालविणारे उर्वरित पैसे सावकारी धंद्यासाठी वापरतात किंवा इतरत्र गुंतवणूक करतात. गोर गरीबांच्या जीवावर भिशी चालक स्वतःची घरे भरत आहेत. भिशी घेणारे दिवसेंदिवस श्रीमंत होत असून इतर सदस्य गरीब होत आहेत. भिशी घेणाऱ्यांच्या कट्ट्यावर पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी देखील बसलेले असल्याने इतर सदस्य देखील दबकूनच असतात.

कमी पैशात लाखो मिळविण्याच्या नादात काही तरुण आणि गरजू अनेक ठिकाणी थोडे थोडे पैसे गुंतविण्यास सुरुवात करतात. आपली भिशी आज न उद्या लागेल या विचारात इतरांकडून ते पैसे उधार किंवा व्याजाने घेतात. उधारी आणि व्याजाच्या नादात ते नैराश्यात पोहचतात. व्यसनांच्या आहारी जात लोक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत देखील येऊन पोहचतात. आजवर कुणी आत्महत्या देखील केली असेल मात्र ते काही समोर आलेले नाही. आज जळगावात सुरू असलेले हे प्रकार वेळीच रोखले गेले नाही तर उद्या एखादा भिशी चालक लाखोंचा चुना लावून पळ काढेल किंवा एखादा सदस्य तरी आपला जीव गमावेल हे निश्चित.

पुढील भागात वाचा.. राज्यातील करोडोंच्या भिशीचे झोल आणि कारवाया!

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---