गुजरातल्या तरुणीने प्रियकरासाठी गाठले जळगाव, लग्नाची प्रक्रिया पूर्ण करतानाच मुलीचे वडील धडकले, अन्..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । प्रेम हे आंधळं असतं. एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही. अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय. गुजरातमधील १९ वर्षीय तरुणीने जळगावातील प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी जळगाव गाठले.

यादरम्यान, दोघांच्या लग्नाची संपूर्ण तयारी होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतानाच तिचे पालक जळगावात धडकले अन् एकच धिंगाणा झाला. प्रियकर प्रेयसीला पोलिस ठाण्यात आणून बसविले, पण मुलीने जाण्यास नकार दिल्याने गोंधळ सुरू होता.

नेमका काय आहे प्रकार?
गुजरात राज्यातील दिंडोली येथील १९ वर्षीय तरुणी आरतीसोबत (काल्पनिक नाव) आणि जळगावचा वैभव (काल्पनिक नाव) हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमात होते. दोघांच्या प्रेमाची सुरुवात वैभव (काल्पनिक नाव)चे मामा दिंडोली येथे वास्तव्यास असून तो कामासाठी मामाकडे गेला होता. तेथेच त्याचे आरतीसोबत (काल्पनिक नाव) प्रेम जुळले.

दरम्यान, दोघांच्या लग्नासाठी कुटुंबीयांचा विरोध असल्याची खात्री झाल्यावर आरतीने कोणासही काही न सांगता घर सोडले. काही महिन्यांपूर्वीच वैभव जळगावला परतला होता. चार दिवसापूर्वी सकाळी आरतीने रेल्वेने जळगाव गाठले. प्रेयसी जळगावला पोहोचल्यावर प्रियकराने घाई गरबडीत लग्नाची तयारी केली. सोमवारी कुठल्याही मंदिरात लग्न (Marriage) उरकून टाकण्याचा बेत असताना, ऐनवेळेस मुलीचे कुटुंब जळगावला आले.

आरती आणि वैभव दोघांनी एका वकिलाच्या मदतीने कायदेशीर बाबी समजून घेतल्या. जिल्‍हा व सत्र न्यायालयासमोरच नोटरी करण्यासाठी दोघेही आले असता, नोटरीवर लिखाणाला सुरवात होण्यापूर्वीच मुलीचा भाऊ आणि आई-वडील धडकले. आरतीच्या भावाने तिला ओळखताच एकच धिंगाणा घालून नातेवाइकांनी तिला मारझोड करण्यास सुरवात केली. वेळीच शहर पोलिस पोहोचल्याने प्रकरण पोलिसांत गेले.

शहर पोलिसांनी आरती आई वैभव यांना पोलिस ठाण्यात आणल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी केली. आरती वयाने सज्ञान असल्याने तिने आई-वडीलांसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतल्याने हात उगारून धमकावणारे, भीती घालणारे कुटुंब नरमले. मुलगी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कुटुंबीयांनी हात टेकत गुजरात पोलिसांशी संपर्क केला. गुजरात पोलिस बेपत्ता मुलीसाठी जळगावला येणार असून, रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत या मुलीचे कुटुंब तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.