जळगाव लाईव्ह न्यूज । रस्त्यात अचानक कुत्रा आल्याने वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील साकळी फाट्याजवळ घडली. जुल्फिकार ईसा तडवी (वय ३५, रा. लोहारा, ता. रावेर, जि. जळगाव) असं मयताचे नाव असून या दुर्घटनेबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुल्फिकार तडवी हे दुचाकी (एमएच-१९ डीजी-९५२३) ने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास यावलहून मोहना या दिशेने जात असताना साकळी फाटा नजीक त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा गंभीर अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अपघाताची माहिती साजीद हमिद तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनला दिली, त्यानुसार अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १४/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सोनवणे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.










