जळगाव लाईव्ह न्यूज । मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पदस्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. त्यानुसार, जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी प्रवीण बागडे यांची पदोन्नतीसह नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी बोरीवली येथील योगेश ताटू यांची जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांनी लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

मोटार वाहन विभागातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर राज्यातील विविध कार्यालयांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांत जळगाव कार्यालयालाही नवा अधिकारी मिळाला असून, प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्य सरकारने मोटार वाहन विभागातील एकूण १९ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, रिक्त पदांवर नव्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.






