
जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगावात महामार्गावरील अपघातांच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसताना, पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. आसोदा रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना सुमारे १०० फूट उंचीवरून क्रेन खाली कोसळली. या दुर्घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला. मधुकर धनराज पाटील (वय ४४, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) असं मयत चालकाचे नाव असून, बायपास महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काही महिन्यापूर्वी मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील आसोदा रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचला होता. या रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामांतर्गत साईड गर्डरचा मोठा भाग क्रेनच्या साहाय्याने उचलला जात होता.
त्याचवेळी क्रेन अंदाजे १०० फूट उंचीवरून खाली कोसळली. उंचीवरून क्रेन कोसळल्याने हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. या घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिसांत नोंद झालेली नव्हती. दरम्यान,अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बिघाडाबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पाळधी ते तरसोद बायपास हा जळगाव परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. मात्र, उड्डाणपुलांच्या दुरुस्तीमुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, बायपास महामार्गावरील दुरुस्तीचे काम रखडल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत १२ जणांचा बळी गेल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





