गुन्हेयावल

किनगावात खळबळ ! आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. पथसंचलन सुरू असताना दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. घटनेमुळे परिसरात काही काळ धावपळ आणि गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. पथसंचलन सुरू असतानाच एका गटाकडून त्याला विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली.

पोलिसांचा हस्तक्षेप; सौम्य लाठीमार

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. तसेच नागरिकांना सूचना देत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. परिसरात निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या घटनेनंतर परिसरात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पथसंचलनादरम्यान नेमका वाद कशामुळे निर्माण झाला आणि दगडफेकीच्या प्रयत्नामागील परिस्थिती काय होती, याबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button