जळगाव जिल्हा

रब्बी ज्वारीसाठी हेक्टरी ७,५०० रुपये अनुदान मिळणार ; शेतकऱ्यांनी कुठे करायचा अर्ज?

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (श्रीअन्न) उपअभियानामध्ये रब्बी ज्वारी पिकासाठी प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी पिकासाठी प्रतिहेक्टरी ७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून, जिल्ह्यासाठी ३ हजार ६१० हेक्टर क्षेत्राचा भौतिक व आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer वरील ‘बियाणे’ या टाइलअंतर्गत संबंधित घटकामध्ये रब्बी ज्वारी, हरभरा व मसूर पिकांसाठी अर्ज करावा.

या घटकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना अर्ज करता येईल. शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. गटांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर करण्यात येणार आहे. प्रति गट कमाल २५ शेतकऱ्यांचा समावेश करता येईल, तसेच एका गावात एका पिकासाठी जास्तीत जास्त दोन गटांची निवड केली जाईल.

योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी सभासदाकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button