⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | विशेष | World Tea Day : जागतिक चहा दिवस : पृथ्वीतलावरील अमृत ‘चहा’

World Tea Day : जागतिक चहा दिवस : पृथ्वीतलावरील अमृत ‘चहा’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।योगेश शुक्ल । पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा (Tea)… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात… पण मर्त्य मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य मानून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली… आज जागतिक चहा (World Tea Day) दिवसाच्या निमित्तानं….

चहा या पेयाचा मूळ जन्म चीनमधला. अशी आख्यायिका आहे की, सुमारे पाच हजार वर्षापूर्वी एक थोर चिनी सम्राट चेन नुंग उन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या नोकर-चाकरांच्यासमवेत एका दूरच्या प्रवासाला निघाला होता. वाटेत विश्रांतीसाठी थांबला असता त्याच्या नोकराने त्याला उकळवलेले पिण्याचे पाणी दिले. अचानक आलेल्या वा-याच्या झोताबरोबर जवळच्या झुडपाची काही सुकलेली पाने त्या पाण्यात पडली. कुतूहलाने त्या सम्राटाने ते विशिष्ट सुगंधी आणि गडद तपकिरी रंगाचे पाणी चाखले. त्याला ती चव आवडली. आणि त्या क्षणीच ‘चहा’ हे पेय म्हणून जन्मास आले. त्यानंतर चहाच्या औषधी गुणांचाही शोध लागला. त्यानंतर चहा जगाच्या सफरीला निघाला आणि चहाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. चीनमध्ये चहा पिणे हे एक सांस्कृतिक कार्य असल्यासारखे पार पाडले जाते. आपल्याकडेसुद्धा घरात अथवा दुकानात मंडळी चहा घेत असतील आणि त्यावेळी कुणी आगंतुक आला तर त्याला चहाचा आग्रह केला जातो. म्हणूनच चहा हा माणसांना जोडणारा दुवा ठरतो. आपल्या दिनक्रमात चहा हा अविभाज्य घटक बनला आहे. मराठी भाषेत ‘चहा करणे’ म्हणजे स्तुती करणे, वाहवा करणे असाही वाक्प्रचार आहे.

तसेच ‘चहाच्या पेल्यातील वादळ’ असंही म्हटलं जातं. तेसुद्धा खूप टोकाचे नसलेले, काही क्षणांपुरते, लुटुपुटुचे, नाती संपुष्टात न आणणारं असं भांडण किंवा बेबनाव यासंबंधी वापरलं जातं, कदाचित चहाची नाती तोडण्याची नव्हे तर जोडण्याची खासियत स्मरूनच आपल्याकडे काही समाजात मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना भेटायला जाण्याला ‘चहा करायला जाणे’ असं म्हणतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे खरोखरच भेटायला जाताना सोबत चहापूड आणि साखर नेली जाते. आणि चहा बनवून दिला जातो. दु:ख असलेल्या त्या घरात चूल पेटत नाही. निदान चहा पिऊन तरी त्या मंडळींना भेटायला आलेल्या लोकांशी बोलण्याची, त्यांना सामोरं जाण्याची ऊर्जा मिळावी हाच त्यामागचा हेतू असावा. एवढय़ा समजूतदारीने केलेले सांत्वन अजून कोणते असू शकेल?

हवेत गारठा असताना मस्तपैकी गरमागरम चहाचे घोट घेण्यासारखे दुसरे सुख नाही. अगदी लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे हा आपला नेम असतो. चहाची वैशिष्ट्ये, त्याचे गुणदोष न पाहता आपण चहा पीत असतो. चहा प्यायल्यावर बरे वाटते, एवढेच काय ते आपण जाणतो. पण चहाचे प्रकार, त्याचे फायदे, चहाचे औषधी मूल्य, चहामुळे होणारे नुकसान याबरोबरच चहा करण्याची अचूक पद्धत याविषयीही जाणून घेणे आवश्यक आहे. ढोबळ मानाने पाहिले तर चहाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सीटीसी आणि ग्रीन टी. सीटीसी म्हणजे कट, टीयर अँड कर्ल या प्रकारचा चहा. तर ग्रीन टी हा नैसर्गिक चहा असतो.

सीटीसी चहा : 

सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुवास वाटतो. पण हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही आणि तितका आरोग्यकारीही नसतो.

ग्रीन टी :

या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. यात कॅलरीही नसते. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गेनिक चहा तयार केले जातात.

हर्बल चहा :

ग्रीन टीत तुळस, अश्‍वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी आहे. औषध म्हणून याचा वापर जास्त होतो.

ऑर्गेनिक टी : 

ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो.

व्हाईट टी : 

हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो. यात कॅफिनही खूप कमी आणि अँटी ऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. एक कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते. तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफिन असते.

ब्लॅक टी :

कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

इन्स्टंट चहा : 

वर्गात टी बॅग्ज वगैरे येतात. म्हणजे पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्जमध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते, हे नैसर्गिक अ‍ॅस्ट्रीजेंट असते. यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग्ज सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात.

लेमन टी : 

लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.

मशीनचा चहा :

अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. गरमागरम चहा पिण्याचे समाधान याशिवाय या चहातून काही मिळत नाही. कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो.
इतरही काही प्रकारचे चहा आहेत, त्यात ताण घालवण्यासाठीचा चहा, रिजूविनेटिंग, स्लिमिंग टी आणि आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात.

उदाहरणार्थ दालचिनी, तुळस वगैरे. दालचिनीमुळे ताजेतवाने वाटते तर तुळशीमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. स्लिमिंग टीमध्येही वजन कमी करण्यास मदत करणारे घटक आहे. चयापचय क्रियेचाही स्तर थोडा वाढतो. पण हा चहा केवळ पूरक म्हणून प्यावा. केवळ या चहाने वजन कमी होत नाही. आईस टीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून तो पिणे हिताचे नाही.

चहाचे फायदे
-चहात कॅफीन आणि टॅनिन असते. हे घटक स्टीम्युलेटर आहेत. यामुळे शरीरात उत्साह वाढतो.
-चहात असलेल्या एल-थियेनाईन नावाच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडमुळे आपला मेंदू अधिक सजग पण शांत राहतो.
-चहात अँटिजन असतात. त्यामुळे त्यात जीवाणू रोधक क्षमता येते.
-चहातील अँटी ऑक्सिडंट घटक
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात आणि अनेक आजारांपासून आपले रक्षण करतात.
-अँटी एजिंग गुणांमुळे चहा वार्धक्य येण्याची प्रक्रिया मंद करतो आणि त्यामुळे शरीरात वयोमानामुळे होणारे त्रासही कमी होतात.
-चहात फ्लोराईड असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि दातही किडत नाहीत.
चहाचे औषधी मूल्य
कर्करोग, हाय कोलेस्टरॉल, अ‍ॅलर्जी, यकृत आणि हृदयाच्या आजारांमध्ये अतिशय गुणकारी मानले जाते. अनेक संशोधनांत आढळून आले आहे की, चहा कर्करोग आणि संधिवात रोखण्यास मदत करतो आणि वाईट कोलेस्टरॉल नियंत्रित करतो. त्याचबरोबर हृदय, यकृताच्या समस्याही चहामुळे कमी होतात.

चहामुळे होणारे नुकसान
-दिवसभरात तीन कपाहून अधिक चहा पिण्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.
-शरीराची लोह सामावून घेण्याची क्षमता कमी होते.
-कॅफीन असल्यामुळे चहा पिण्याचे व्यसन लागू शकते.
-अधिक चहा पिण्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
-पचनसंस्था बिघडू शकते.
-दातांवर डाग पडतात. पण कॉफीने जास्त डाग पडतात.
-रात्री उशिरा चहा पिण्याने झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
चहात दूध आणि साखर घातल्याने चहाचे गुण कमी होतात. दूध घातल्याने चहातील अँटी ऑक्सीडंटची सक्रियता कमी होते. तर साखर घातल्याने कॅल्शियम कमी होते आणि वजन वाढते. यामुळे पित्ताचा त्रास वाढतो.

चहा करण्याची अचूक पद्धत
पाणी घ्या. ते चांगले उकळवा. पाण्याला अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त उकळू नका. एका कोरड्या भांड्यात चहाची पूड टाका. त्यानंतर उकळलेले पाणी त्यात घाला. पाच ते सात मिनिटे भांडे झाकून ठेवा. त्यानंतर कपात गाळून घ्या. चवीनुसार त्यात दूध आणि साखर घाला. एक कप चहा बनवण्यासाठी अर्धा चमचा चहाची पूड पुरेशी असते. चहाची पूड, दूध आणि साखर एकदम उकळून चहा तयार करण्याची पद्धत योग्य नाही. यामुळे चहाचे सर्व गुण नष्ट होतात.

चहा केव्हा प्यायचा?
आपण चहा केव्हाही पिऊ शकतो. पण बेड टी आणि रात्री झोपायच्या आधी चहा घेणे शक्यतो टाळा. रात्री झोपण्याने आणि आराम करण्याने आपली आतडी ताजीतवानी झालेली असते. अशा वेळी उठल्याउठल्या चहा पिणे योग्य नाही. रात्री उशिरा चहा पिण्याने झोप येत नाही. दिवसातून तीन कपांपेक्षा चहा जास्त पिऊ नका. दूध आणि साखर घातलेला चहा तीन कपांपेक्षा जास्त नको. बराच वेळ ठेवलेला चहा पिऊ नका. चहा पुन्हा पुन्हा उकळून पिणेही योग्य नाही.

चहावर मनापासून प्रेम करणारी मंडळी जशी असतात तशी ‘मी चहा घेत नाही’ चहाने अ‍ॅसिडिटी होते,’ असं सांगणारी मंडळीही असतात. कोणत्याही पदार्थाच्या अतिरिक्त सेवनाने त्रास हा होतोच, हे ती मंडळी सोयीस्कररीत्या विसरतात. चहाची लज्जत घेण्याची प्रत्येकाची सवय वेगवेगळी असू शकते. चहाची बैठक बिस्किटे, ब्रुन मस्का पाव, खारी, बटर, पोळी यांसोबत छान जमते. अशा प्रकारे सुखाच्या प्रसंगांची रंगत वाढवणारा आणि दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा सुर्र्र के पिओ !!!

– योगेश शुक्ल, +91-9657701792

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.