जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२६ । भारतामधील शेती मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे दरवर्षी मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला झाल्यांनतर आता देशासह महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे.

जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, यंदा भारतातील मान्सूनवर ‘अल नीनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हा प्रभाव वाढल्यास देशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. अशा परिस्थितीत पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला मोठा फटका बसू शकतो आणि काही भागांना दुष्काळाचाही सामना करावा लागू शकतो.

महाराष्ट्रातही यंदा अल नीनोचा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात असून उन्हाचा कडाकाही अधिक तीव्र होऊ शकतो. तापमानात वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या अल नीनोचा प्रभाव किती राहील याबाबत ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. देशातील पावसाची नेमकी परिस्थिती आणि मान्सूनची दिशा मे महिन्यानंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचे कारण नसले तरी शेतकरी आणि प्रशासन दोघेही मान्सूनच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून आहेत.











