महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेचा परराज्यातील महिलांनी घेतला लाभ; असा समोर आला रॅकेट?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. मात्र आता या योजनेमध्ये चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट समोर आले आहे.
लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क ११७१ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखवले आहेत. प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे पोलिस, महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या तपासात पुढे आले आहे. याबाबत सोलापुर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्या दोन लॉगिनवरून ११७१ अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी २२ अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत. या अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे.
शासनाने योजना घोषित केली तेव्हा लाडकी बहीणच्या पोर्टलवर कुणीही लॉगिन आयडी बनवू शकत होते.ऑनलाईन अर्ज करताना आधार क्रमांक टाईप करून त्याखाली आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागत होती. त्यानुसार आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्डची अस्पष्ट दिसणारी कॉपी त्यावर अपलोड केली. जेणेकरून प्रत्यक्ष ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी होईल, तेव्हा आधार कार्डवरील पत्ता दिसणार नाही, अशी ही शक्कल होती.
कसे आले उघडकीस?
अर्जांची छाननी करताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये मुस्मिम महिलांची नावे लाडकी बहीण योजनेत आढळली. प्रत्यक्षात त्या गावात एकही मुस्लिम नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले बँक खाते तपासले, ते खाते सेंट्रल बँकेचे होते. त्यानुसार सेंट्रल बँकेतून संबंधित खातेदाराचा पत्ता आणि मोबाईल काढला असता ते चक्क उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील असल्याचे आढळले.