
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील सराफ बाजारातील दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ममताज परवीन अब्दुल्ला असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून अज्ञात महिलेने हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे पेंडल असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आवश्यक सूचना देऊन पथक कार्यरत केले.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून चोरी करणारी महिला अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील अकोट फैल परिसरातील नेहरू नगर, सोलाशे प्लॉट येथील रहिवासी ममताज परवीन अब्दुल्ला हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला सोन्याचा मंगळसूत्र व सोन्याचे दोन पेंडल असा एकूण सुमारे ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, वजन १४.४८० ग्रॅम, किंमत २ लाख ४० हजार रुपये, तसेच सोन्याचे दोन पेंडल, वजन ३.३२० ग्रॅम, किंमत ६० हजार रुपये, असा मुद्देमाल समाविष्ट आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि भुसावळ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या पथकात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. सराफ बाजारातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.





