वाणिज्य

रॉयल एनफिल्डची स्पेशल बाईक लॉन्च! फीचर्ससह आणि किंमत घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रसिद्ध मोटरसायकल उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डने आपल्या शक्तिशाली बाईकची एक विशेष आवृत्ती बाजारात आणली आहे. कंपनीने ‘रॉयल एनफिल्ड १२५ (Royal Enfield Classic 650) व्या ॲनिव्हर्सरी एडिशन हायपरशिफ्ट क्लासिक सादर केली आहे. ही बाईक आपल्या आकर्षक रंगसंगतीमुळे आणि खास डिझाइनमुळे चर्चेत आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे प्रकाशाच्या कोनानुसार तिच्या बॉडीवरील रंग लाल, हिरवा आणि सोनेरी अशा छटांमध्ये बदलताना दिसतो. कंपनीने या विशेष आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत ४,२५,५८९ रुपये ठेवली आहे.

या ॲनिव्हर्सरी एडिशनचे उत्पादन मर्यादित ठेवण्यात आले आहे. कंपनीने प्रत्येक प्रमुख जागतिक विभागासाठी केवळ १२५ युनिट्स उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच १६ ऑक्टोबर २०२६ पासून नोंदणी सुरू झाली असून, २८ ऑक्टोबरपासून विक्री सुरू होणार आहे. या विशेष बाईकची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या बाईकचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘हायपरशिफ्ट’ फिनिश. प्रकाश पडण्याच्या कोनानुसार तिच्या पेंटवर्कमध्ये लाल, हिरव्या आणि सोनेरी रंगांच्या छटा दिसतात. १९०१ मधील रॉयल एनफिल्डच्या सुरुवातीच्या मोटरसायकलपासून प्रेरित पितळेच्या रंगछटांचाही या डिझाइनमध्ये वापर करण्यात आला आहे. फ्युएल टँक, साइड पॅनल, मडगार्ड आणि हेडलॅम्पच्या आसपासच्या भागात हे खास फिनिश दिसते. काळ्या रंगातील इंजिन आणि एक्झॉस्टमुळे बाईकच्या बाह्यरूपाला वेगळा उठाव मिळतो.

या बाईकमध्ये काय विशेष आहे?

ही फिनिशिंग फ्युएल टँक, साईड पॅनल, मडगार्ड आणि अगदी हेडलॅम्पवरही दिसते. काळे इंजिन आणि एक्झॉस्टचे घटक याला आणखी कॉन्ट्रास्ट देतात. या बाईकमध्ये क्लासिकची सिग्नेचर टियरड्रॉप-स्टाईल फ्युएल टँक, गोलाकार बॉडीवर्क आणि नॅसेल-माउंटेड हेडलाईट आहे.या मोटरसायकलमध्ये विंटेज-स्टाईलची तपकिरी लेदरची रायडर सीट आहे. वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लॅम्प आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. यात पारंपरिक बल्ब टर्न इंडिकेटर्स देखील आहेत. वायर-स्पोक व्हील्स, गोलाकार आरसे आणि ब्लॅक-फिनिश ट्विन एक्झॉस्ट.

६४८ सीसी ट्विन-सिलिंडर इंजिन

या विशेष आवृत्तीमध्ये क्लासिक ६५०चे ६४७.९५ सीसी, फ्युएल-इंजेक्टेड, ट्विन-सिलिंडर इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन ३४.६ किलोवॅट म्हणजेच सुमारे ४६.३ अश्वशक्ती पॉवर आणि ५२.३ न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत सहा-स्पीड गिअरबॉक्स आणि वेट मल्टी-प्लेट क्लच देण्यात आला आहे.

किंमत ४.२५ लाख रुपये

रॉयल एनफिल्ड क्लासिक ६५० हायपरशिफ्ट ॲनिव्हर्सरी एडिशनची एक्स-शोरूम किंमत ४,२५,५८९ रुपये आहे. मर्यादित उत्पादन, वेगळे रंग बदलणारे फिनिश आणि कंपनीच्या १२५ वर्षांच्या प्रवासाशी जोडलेली ओळख यामुळे ही बाईक कलेक्टर्स आणि रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खास ठरू शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button