गुन्हेजळगाव जिल्हा

अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याची मृत्यूशी झुंज संपली!

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील उमाळा-कंडारी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अर्जुन प्रल्हाद कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो कंडारी येथील रहिवासी होता. या दुर्दैवी घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कंडारी गावात शोककळा पसरली आहे.

काय आहे घटना?

दोन दिवसापूर्वी सायंकाळी जळगाव तालुक्यातील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आठ ते दहा विद्यार्थी जखमी झाले होते. ज्यामध्ये कंडारी येथील १६ वर्षीय अर्जुन कोळी हा गंभीर जखमी झाला होता.

अर्जुन सह सर्व जखमी विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना अर्जुन कोळीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. अल्पवयीन विद्यार्थ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अर्जुनच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एका होतकरू विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्याने कंडारी गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button