जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहे. अशातच एरंडोलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यात ५२ वर्षीय महिलेचे तोंड कपड्याने बांधून व हातपाय दोरीने बांधून तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी ३८ हजार रुपयाचे सोने चांदीचे दागिने व १५५० रुपये रोकड असा एकूण ३९ हजार ५५० रुपयाचा ऐवज लंपास करून पोबारा केला. ही घटना एरंडोल येथील जय हिंद चौक परिसरात घडली आहे. याबाबत संबंधित महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

याबाबत असे की, एरंडोल येथील गांधीपुरा भागातील जय हिंद चौकात उषाबाई भिका बडगुजर (वय ५२) ह्या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर हे २००३ मध्ये वारले असून त्यांना दोन अपत्य आहेत. ते जळगाव येथे राहतात. सावत्र मुलगा अरुण भिका बडगुजर हा अधून मधून एरंडोल येथे उषाबाई बडगुजर यांच्या घरी येत होता. तो उषाबाईला ठार मारण्याचे धमकावत होता.

रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यावर त्यांच्या घराच्या पुढच्या खोलीमध्ये लोखंडी गेटला कुलूप लावून त्या झोपल्या. या कुलपाची एक चावी त्यांचा सावत्र मुलगा अरुण याच्याकडे होती. उषाबाई रात्री गाढ झोपत असताना रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक तीन-चार जण घरात शिरले व त्यांनी उषाबाईचे तोंड व हात पाय दोरीने बांधले. त्यांनी उषाबाईच्या अंगावर असलेले दागिने व रोकड काढून नेले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.












