Bhusawal : बसमधील ‘लेडी चोरटी’ गजाआड ! लाखो रुपयांची सोन्याची पोत जप्त, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

एप्रिल 27, 2026 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मात्र, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी एका सराईत महिला चोरटीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत केली असून, या अटकेमुळे बसस्थानक परिसरात सक्रिय असलेल्या चोऱ्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

scb

काय आहे घटना?

मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (६२) या २३ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ बसस्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ ग्रॅमची सोन्याची पोत लंपास केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी बसस्थानकावरील चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते. तपासाचे चक्र फिरवत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपयांची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत पोलिसांनी जप्त केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा आणि पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकाँ कांतीलाल केदारे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now