जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात बसस्थानक आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पैसे-दागिने चोरी होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच पाचोरा बस स्थानकावर एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली असून, तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?
भडगाव येथील विवेकानंद कॉलनीतील रहिवासी जयश्री स्वप्नील पाटील (वय २२) ही गृहिणी दि. १५ एप्रिल रोजी आसनखेडा येथून पाचोरा येथे एम.एम. कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आली होती. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास परीक्षा संपवून ती पुन्हा गावी जाण्यासाठी जळगाव बसमध्ये बसली. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपास करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. संगिता करण सोळुंखी (वय ४२) ही महिला संशयास्पद रित्या बस स्थानक परिसरात फिरत असल्याचे समजताच पथकाने तिला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी महिलेने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल, ज्यात सोन्याचा मणी आणि दोन डोरले यांचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी श्रीकांत गायकवाड करीत आहेत.











